पण तरीही...
शुभ रात्री आणि good morning चा रोज पाऊस पडतो सगळीकडे
पण त्यात तुझं सुप्रभात नसेल तर किती बेचैनी होते
तर तू रोज सुप्रभात पाठवच
माझं तुला असं नुसतं कॉफी साठी भेटून समाधान नाही होणारे
तुझं ही नाही होणारे हे तुलाही माहितीये
पण तरीही तू भेट
उगीच असं लांब लांब बसण्यात
काही मजा नाही बघ
हातात हात गुंफता येत नाहीत
की खांद्याला खांदा भिडवून बसता येत नाही
पण तरीही तू भेटच
हे नुसतं चॅटिंग करून
उगीच आभास निर्माण होतो जवळ असल्याचा
आणि चॅटिंग संपल्यावर फुगा फुटावा आणि हवा विरून जावी असं होत
पण तरीही तू व्यक्त हो
फोनवर प्रत्यक्ष बोलून समाधान होत नाही
तुझं मला दटावण ही आठवत राहतं
"मला फोनवर अश्या आवाजात आर्जव करायची नाहीत"
तेव्हा राग येतो,
पण कळत असत की आर्जव करूनही भेटू शकत नसल्याने
तुझ्या ही मनात किती खळबळ माजत्ये ते
पण तरीही तू दटाव मला
हे सगळं सगळं करूनही
माझ्यासाठी जी छान छोटीशी जागा तयार केली आहेस न तुझ्या जगात
ती तशीच ठेव
मला आणि माझ्या आठवणींना
तशीही छोटीशी कुपी एवढी जागा पुरेशी आहे तुझ्या आयुष्यात सुगंध भरायला
अट मात्र एकच
ती कुपि उघडी ठेव, दरवळू दे तिचा सुवास
हवाहवासा, रोज थोडा थोडा पसरणारा,
मोहक
© मेघा