तू बरसलास की किती मोहक वाटायचं..
बहरून जायचं सारं वातावरण आणि आसमंत..
तू बरसायचास जेव्हा तू दुःखी असायचा..
कधी प्रेम, कधी दिलासा किंवा माझा सहवास मिळाला की तू शांत व्हायचास..
पण आजकाल तू रोज बरसतोय..
तिन्ही त्रिकाळ..
चिखल केलाय सगळ्या भावनांचा..
त्यात अडकायच नाही जणू मला.
आणि म्हणून मी दूर पळतेय...
कधी आडोसा घेते तर कधी आत कोंडून घेते स्वतःला..
दुरून बघत राहते तुझ बरसण..
हा च विचार करून की हा ही ऋतू सरेल..
माझा दुरावा सहन करत तू काही महिने बरसत राहतोस...माझी वाट तरीही बघत राहतोस...
आणि मग निघून जातोस दूर..एक दिवस..अचानक!
तेव्हा होते मला तुझी जाणीव..तुझ्या नसण्याची...
तुझ्या ओलाव्याची..
तुझ्या आसमंत बहरून टाकण्याची..
तुझ्या गारव्याची..
तुझी ओढ...तुझा सहवास..तुझ बरसण..सगळं च आठवत राहत आणि मग...
मी बरसत राहते तुझ्या आठवणीत...
कोरडी..एकटी..तुझीच वाट बघत...
No comments:
Post a Comment