Friday, October 24, 2025

*मी तिथेच उभा असेन...*

*मी तिथेच उभा असेन...*

कुठून सुरुवात करू?
कदाचित त्या क्षणापासून —
जेव्हा तुला पहिलं होतं,
आणि सगळं थांबल्यासारखं झालं होतं.

तू आवडलीस —
सुरुवातीला फक्त नजरेने,
नंतर हृदयाने,
आणि शेवटी — आत्म्याने.

ते एकतर्फी प्रेम होतं,
महिने, वर्ष नव्हे — तर दशकांपर्यंत पसरलेलं.
कधी फिकं न पडलेलं,
कधी मलिन न झालेलं —
जणू काळाच्याही पलीकडचं एक अघटित नातं.

आणि मग एक दिवस —
तो हवाहवासा, पण स्वप्नवत असणारा दिवस उजाडला.
तू माझ्यासमोर उभी होतीस.
फक्त भेटलीस नाहीस —
तर जणू माझ्या स्वप्नातूनच समोर अवतरलीस.

त्या भेटीत काहीतरी जादू होती...
जणू नव्या विश्वाचा एक दरवाजा उघडला,
ज्यात आपण दोघेच होतो,
वेळ, शंका, भीती काहीच नव्हती!!

त्या दुनियेत आपण हरवून गेलो,
दिवस गेले, महिने गेले —
कळलंच नाही.

पण जीवनाचं वास्तव नेहमीच सावल्यांसारखं मागोमाग येतं.
काही गोष्टी घडल्या...
मी गोंधळलो, घाबरलो,
थांबलो, आणि पुन्हा चालू लागलो...
पुन्हा काही घडलं, पुन्हा थांबलो...

आणि हळूहळू —
सुरुवातीचा तेजोमय संवाद मंदावत गेला...

तुला माझी  खूप गरज होती (आहे)—
पण माझ्याकडून जमेनासं झालं.
प्रयत्न प्रामाणिक होते, पण अपुरे.
आणि तेच खरं होतं.

संयम, प्रगल्भता — या शब्दांचा अर्थच मिटून गेला.
तू बिथरलिस...
तुझ्या अपेक्षा स्पष्ट सांगू लागलीस,
आणि मी — समजूनही काहीच करू शकलो नाही.

तू विचारलंस,
*समोरच्याला दुखावणार प्रेम, प्रेम असतं का?*
ते उत्तर मी आजही शोधतोय...
कारण, मुद्दाम नाही दुखावलं तुला —
दुखवूच शकत नाही मी तुला.

पण प्रश्न तेच,
उत्तरही तेच —
आणि तू कंटाळलीस त्या न संपणाऱ्या फेऱ्यांना!

प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करण्याची इच्छा होती,
पण प्रत्येक सुरुवात अपराध्यासारखी वाटायची.
संवादातही अपराधभावाची सावली पडली होती.

हो, चूक मान्य केली —
पण तिचं ओझं मात्र वाढतच गेलं.

तू खूप शिस्तबद्ध होतीस,
आणि तशीच अपेक्षा माझ्याकडूनही होती.
तुमचं जेवणानंतर एकत्र टीव्ही पाहणं असो,
किंवा वेळेचं बंधन पाळणं —
मी त्या क्षणांचा, त्या पद्धतीचा अगदी मनापासून आदर केला,
पण त्या पद्धतीनं जगणं मला जमलं नाही.

मी प्रयत्न केले — अनेक वेळा —
*पण मी कदाचित ऋतूसारखाच आहे...
*कधी मुसळधार, तर कधी पूर्ण कोरडा...*

आता तू जो काही निर्णय घेतलास —
आणि तो योग्यच असेल कदाचित.
*दशकांपासून ज्या गोष्टीची वाट पाहिली, त्याचा शेवट होणं असह्य आहे!* —

पण त्याच वेळी,
तुला होणाऱ्या दुःखाला मीच कारण असणं,
हे अधिक असह्य आहे.

खोटी आश्वासने मी देऊ शकत नाही.
तू मला ओळखतेस —
माझ्या ऋतूंसकट.

आता निर्णय तुझाच आहे —
घे, तुलाच घ्यावा लागेल.

आणि मी...
मी तिथेच उभा असेन —
जिथे तुला प्रथम पाहिलं होतं,
त्याच शांततेत,
त्याच प्रेमानं,
आणि त्या न बोललेल्या शब्दांमध्ये...
तसाच... नेहमीसारखा... तुझाच.

No comments:

Post a Comment