तुझ्या डोळ्यात खरच माझ्यासाठी प्रेम दिसते का
ते बघायचे आहे..
तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून तो सुकून अजूनही मिळतो का
ते बघायचे आहे..
तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
तुझ्या मिठीत मी आजही हरवते का
ते बघायचे आहे..
तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळाली च नाही
ती ऐकायची आहेत ..
तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
माझ्या मनाला भिडलेले ते गाणे ऐकून तुला काय वाटले होते
ते ऐकायचे आहे ..
तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
खरच का बोलणे बंद केलेस माझ्याशी
ते ऐकायचे आहे..
तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
बोलणे नव्हते पण आठवण यायची का तुला माझी
हे विचारायचे आहे..
तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
आठवण येत होती मग तरीही बोलणे का होत नव्हते
हे विचारायचे आहे..
तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
डोळे बंद केलेस की तू डोळ्यासमोर येतोस. ते येणे बंद कर.
हे ठणकावून सांगायचे आहे..
तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
तू दिलेल्या प्रेमाच्या आणाभाका, स्वप्नं, आशा...
परत करायच्या आहेत..
तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
प्रेम खूप होते पण तरीही..पण तरीही कुठे बिनसले..
हे माहीत करून घ्यायचे आहे..
तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे...
अपुर्ण राहिलेल्या ह्या नात्याला एक पूर्णविराम द्यायचा आहे..
तुला एकदाच शेवटचे भेटायचे आहे..
तुला एकदाच शेवटचे भेटायचे आहे !
- ऋ तू जा
No comments:
Post a Comment