माझ्यात कुठेतरी खोल दडपलेलं,
संवेदनांचं एक अव्यक्त गुपित होतं,
प्रेमाचं बीज होतं जरी,
तरीही त्यावर न बोलण्याचं मौन होतं...
तू आलास, नि त्या मौनाला सूर मिळाले,
माझ्या हृदयातील बंद दरवाजे उघडले,
जे मी स्वतःपासून लपवलं होतं,
ते तू सहज ओळखून जागं केलं...
त्या प्रेमाला शब्द मिळाले,
स्पर्श, हसू, नि अनाहूत ओलावा,
आणि अगदी त्याच क्षणी,
तू मात्र मागे फिरलास...शांत...निव्वळ सावलीसारखा.
तुझं जाणं म्हणजे जणू जखमेवरची खपली निघणं,
जी आत खोलवर जखम होती,
ती पुन्हा ताजी झाली,
भळाभळा रक्त वाहू लागलं,
वेदना पुन्हा अंगात भिनू लागल्या...
आता ते थांबायचं नाव काढत नाही,
का थांबावं, ज्या क्षणी प्रेमानं स्वतःला उघडलं,
त्या क्षणीच तू गेलास,
आणि माझ्या आतल्या शांततेचा अंत झाला...
हे दुखणं आता थांबेल,
जेव्हा पुन्हा एक नवी खपली बसेल,
पण तीही कधीच जुन्या त्वचेइतकी मजबूत नसेल,
कारण आता तुझ्या जाण्याची आठवण कायमची तिच्यात राहील...
- ऋतुजा
No comments:
Post a Comment