Friday, November 14, 2025

कसा आहेस

कसा आहेस रे ?

मजेत च असतोस तू..ठाउक आहे मला!
फारसे मनाला लावून न घेणारा अणि 
आयुष्य आनंदात जगणारा नाही का तू?
विसरलेच  😀

पण..रोज सकाळी 'जेव्हा" तू मला गुड मॉर्निंग मेसेज करायचास...'आता' त्या  वेळे ला चुकल्या चुकल्यासारखे वाटते का रे ? 

आपण भेटलो ते ठिकाण,  त्या जागा, 
जिथे आपण बरीच स्वप्नं पहिली..
तिथे गेलास की  पोटात गोळा येतो का रे?

ती  वळणे....
जिथे आपण  नजर भेटी साठी 
मुद्दाम रेंगाळायचो..
तिथे पोचल्यावर मनात धडधड वाढते का रे?

तो कट्टा जिथे आपण सगळे उनाडक्या करायचो 
पण तरीही नजरेने एकमेकांशी बोलायचो ...
तिथे बसल्यावर मन उदास होत का?

कुठलीही love story पाहिली की  relate होते का रे ?

मला होते हे सगळे...!!

कुठलीही गोष्ट तुटली की ती जोडता येत नाही..
मन तरी त्याला अपवाद कसे असेल..








Friday, October 24, 2025

*मी तिथेच उभा असेन...*

*मी तिथेच उभा असेन...*

कुठून सुरुवात करू?
कदाचित त्या क्षणापासून —
जेव्हा तुला पहिलं होतं,
आणि सगळं थांबल्यासारखं झालं होतं.

तू आवडलीस —
सुरुवातीला फक्त नजरेने,
नंतर हृदयाने,
आणि शेवटी — आत्म्याने.

ते एकतर्फी प्रेम होतं,
महिने, वर्ष नव्हे — तर दशकांपर्यंत पसरलेलं.
कधी फिकं न पडलेलं,
कधी मलिन न झालेलं —
जणू काळाच्याही पलीकडचं एक अघटित नातं.

आणि मग एक दिवस —
तो हवाहवासा, पण स्वप्नवत असणारा दिवस उजाडला.
तू माझ्यासमोर उभी होतीस.
फक्त भेटलीस नाहीस —
तर जणू माझ्या स्वप्नातूनच समोर अवतरलीस.

त्या भेटीत काहीतरी जादू होती...
जणू नव्या विश्वाचा एक दरवाजा उघडला,
ज्यात आपण दोघेच होतो,
वेळ, शंका, भीती काहीच नव्हती!!

त्या दुनियेत आपण हरवून गेलो,
दिवस गेले, महिने गेले —
कळलंच नाही.

पण जीवनाचं वास्तव नेहमीच सावल्यांसारखं मागोमाग येतं.
काही गोष्टी घडल्या...
मी गोंधळलो, घाबरलो,
थांबलो, आणि पुन्हा चालू लागलो...
पुन्हा काही घडलं, पुन्हा थांबलो...

आणि हळूहळू —
सुरुवातीचा तेजोमय संवाद मंदावत गेला...

तुला माझी  खूप गरज होती (आहे)—
पण माझ्याकडून जमेनासं झालं.
प्रयत्न प्रामाणिक होते, पण अपुरे.
आणि तेच खरं होतं.

संयम, प्रगल्भता — या शब्दांचा अर्थच मिटून गेला.
तू बिथरलिस...
तुझ्या अपेक्षा स्पष्ट सांगू लागलीस,
आणि मी — समजूनही काहीच करू शकलो नाही.

तू विचारलंस,
*समोरच्याला दुखावणार प्रेम, प्रेम असतं का?*
ते उत्तर मी आजही शोधतोय...
कारण, मुद्दाम नाही दुखावलं तुला —
दुखवूच शकत नाही मी तुला.

पण प्रश्न तेच,
उत्तरही तेच —
आणि तू कंटाळलीस त्या न संपणाऱ्या फेऱ्यांना!

प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करण्याची इच्छा होती,
पण प्रत्येक सुरुवात अपराध्यासारखी वाटायची.
संवादातही अपराधभावाची सावली पडली होती.

हो, चूक मान्य केली —
पण तिचं ओझं मात्र वाढतच गेलं.

तू खूप शिस्तबद्ध होतीस,
आणि तशीच अपेक्षा माझ्याकडूनही होती.
तुमचं जेवणानंतर एकत्र टीव्ही पाहणं असो,
किंवा वेळेचं बंधन पाळणं —
मी त्या क्षणांचा, त्या पद्धतीचा अगदी मनापासून आदर केला,
पण त्या पद्धतीनं जगणं मला जमलं नाही.

मी प्रयत्न केले — अनेक वेळा —
*पण मी कदाचित ऋतूसारखाच आहे...
*कधी मुसळधार, तर कधी पूर्ण कोरडा...*

आता तू जो काही निर्णय घेतलास —
आणि तो योग्यच असेल कदाचित.
*दशकांपासून ज्या गोष्टीची वाट पाहिली, त्याचा शेवट होणं असह्य आहे!* —

पण त्याच वेळी,
तुला होणाऱ्या दुःखाला मीच कारण असणं,
हे अधिक असह्य आहे.

खोटी आश्वासने मी देऊ शकत नाही.
तू मला ओळखतेस —
माझ्या ऋतूंसकट.

आता निर्णय तुझाच आहे —
घे, तुलाच घ्यावा लागेल.

आणि मी...
मी तिथेच उभा असेन —
जिथे तुला प्रथम पाहिलं होतं,
त्याच शांततेत,
त्याच प्रेमानं,
आणि त्या न बोललेल्या शब्दांमध्ये...
तसाच... नेहमीसारखा... तुझाच.

Saturday, October 18, 2025

एकदा भेटायचे आहे

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
तुझ्या डोळ्यात खरच माझ्यासाठी प्रेम दिसते का  
ते बघायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून तो सुकून अजूनही मिळतो का 
ते बघायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
तुझ्या मिठीत मी आजही हरवते का 
ते बघायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळाली च नाही  
ती ऐकायची आहेत ..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
माझ्या मनाला भिडलेले ते गाणे ऐकून तुला काय वाटले होते 
ते ऐकायचे आहे ..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
खरच का बोलणे बंद केलेस माझ्याशी 
ते ऐकायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
बोलणे नव्हते पण आठवण यायची का तुला माझी 
हे विचारायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
आठवण येत होती मग तरीही बोलणे का होत नव्हते 
हे विचारायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
डोळे बंद केलेस की तू डोळ्यासमोर येतोस. ते येणे बंद कर. 
हे ठणकावून सांगायचे आहे..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
तू दिलेल्या प्रेमाच्या आणाभाका,  स्वप्नं, आशा...
परत करायच्या आहेत..

तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे..
प्रेम खूप होते पण तरीही..पण तरीही कुठे बिनसले..
हे माहीत करून घ्यायचे आहे..


तुला एकदा शेवटचे भेटायचे आहे...
अपुर्ण राहिलेल्या ह्या नात्याला एक पूर्णविराम द्यायचा आहे..

तुला एकदाच शेवटचे भेटायचे आहे..
तुला एकदाच शेवटचे भेटायचे आहे !

-  ऋ  तू  जा 

Wednesday, September 24, 2025

शुल्लक

त्याचे माझ्यावरचे प्रेम अगदीच शुल्लक होते,
त्याचे संपले केव्हाच होते , माझे मात्रं अजून शिल्लक होते,
हसते मी कधी कधी ह्या माझ्याच लाचारीला,
त्याच्याकडे मात्र हे घातक मौन अजूनही मुबलक आहे,
मीही आता टाळते आहे रोज त्याच्या आठवणी,
कळले मला आता माझीच  कुठेतरी गल्लत होत होती ..

Monday, September 22, 2025

किती वेळ वाट बघायची मी


किती वेळ वाट बघायची मी…

ह्या ऋतूत  पाऊस  थांबण्याचे  नाव घेत  नाहिये कदाचित आपण भेटू ही आशा त्यालाही असेल का पावसाचे थेंब खिडकीवर ओथंबलेले                       पण तुझी पाऊलखूण दूरवर सुद्धा नाही…


मनातही ओल वाढलीये,
बाहेरसारखीच…
फरक एवढाच—
तिथे पाऊस आनंद देतोय 
इथे तो प्रश्न  विचारतोय.

रात्र सरायला तयार नाही,
कारण संवाद अडकलेत
आपल्या दोघांच्या मध्ये...ते  पूर्ण करायला तरी ये  .


स्वप्नंही आता बुचकळ्यात पडलेत.                       खरंच का तू फक्त तिथेच असतोस?

माझच हसू माझ्याशी बोलतं—
“अर्धवट का जगतेस?
पूर्ण का नाही हसत?”

आणि मी पुन्हा त्याच प्रश्नासमोर—
किती वेळ वाट बघायची मी?


- ऋतुजा 


किती वेळ वाट बघायची मी



किती वेळ वाट बघायची मी,
तुझी भेट होईल म्हणून,
ढगांनीही थांबून धरलेत अश्रू,
पावसाचा नाद थांबतच नाही.

बाहेर टपटप थेंब पडतात,
आणि आत मनातही गारवा दाटतो,
पण तुझ्या एका शब्दाशिवाय
हा गारवा कधी कधी काटा होतो.

रात्रही लांबत चाललीय,
जणू चंद्रालाही माहितीये—
आपले संवाद अर्धवट राहिलेत,
आणि माझ्या डोळ्यांत प्रश्न झोपलेत.

स्वप्नंही घाबरून विचारतात,
“आपण खरंच फक्त स्वप्नापुरतेच का?”
आणि हसू, जे मनाला उचलून नेतं,
तेही आता दाराशी थांबतं.

ते विचारतं—
“इतकं मोजून मापून का हसावं?
हृदय अर्धवट का थांबावं?”

सांग ना...
किती वेळ वाट बघायची मी,
तुझ्या पावलांच्या त्या एका आवाजासाठी...



Thursday, September 18, 2025

आठवण

कधी कधी शब्द संपतात, 
पण आठवणी संपत नाहीत…
कधी कधी ओठ शांत असतात, 
पण हृदय ओरडतं…..
कधी कधी आपण हसतो, 
पण आतून तुटून पडतो…
खरं सांगायचं तर, 
नातं किती दिवस टिकतं हे महत्त्वाचं नसतं,
पण ते नातं आपल्याला किती जिवंत ठेवतं हे महत्त्वाचं असतं.......
आजही तुला आठवलं की,
डोळ्यांच्या काठावर पाणी थांबत नाही,
कारण तू फक्त व्यक्ती नाहीस…..
तू आठवण झाला आहेस…
आणि आठवणी कधीच मरत नाहीत......