Thursday, May 21, 2026

पहिलं प्रेम, चंद्र, सूर्य

 पहिलं प्रेम म्हणजे

पहाटेच्या धूसर दवात अलगद उमललेलं स्वप्न…

ज्याला स्पर्श नसतो,

पण जाणिवा मात्र आयुष्यभर हात धरून चालतात…

चंद्र आणि सूर्य जसे

एका आकाशात राहूनही

कधीच समोरासमोर येत नाहीत,

तसंच काही प्रेम असतं —

न भेटणारं…

पण न तुटणारं…

त्यांच्या वेळा कधी जुळत नाहीत,

एक उगवत असतो

तेव्हा दुसरा मावळत असतो…

तरीही दोघेही

एकमेकांच्या अस्तित्वावरच तर जगत असतात.

तुझं आणि माझंही

कदाचित तसंच काहीसं होतं…

तू माझ्या दिवसांचा सूर्य,

आणि मी तुझ्या रात्रींचा चंद्र…

एकमेकांच्या वाटेला न आलेलो,

पण एकमेकांशिवाय अपूर्ण…

लोक म्हणतात —

*न भेटणारं प्रेम अपूर्ण असतं*…

पण त्यांना कुठे कळतं,

काही प्रेमांना

पूर्ण होण्यासाठी

एकत्र येणं गरजेचं नसतंच…

कधी कधी

प्रेमाचा अंकुर

फुल होण्याआधीच

मनात कायमचा जपला जातो…

आणि मग

त्या न उमललेल्या फुलाचाच सुगंध

संपूर्ण आयुष्यभर सोबत राहतो…

वेळ, काळ, अंतर…

या सगळ्या मर्यादा

फक्त शरीरांना थांबवू शकतात,

मनांना नाही…

कारण खरं पहिलं प्रेम

कधी संपत नाही

ते फक्त

चंद्रासारखं शांत होत जातं…

आणि सूर्याप्रमाणे

दररोज नव्याने उगवत राहतं

Wednesday, May 13, 2026

किनारा

मी इथे किनाऱ्यावर आहे...
नाही उडी मारणार आता प्रेमाच्या त्या डोहात किंवा महासागरात...

का काय विचारतोस? 
नाही कळले तुला अजूनही?

मारली होती उडी आपण..दोघांनीही...आणि वाहत होतो त्या प्रेमाच्या प्रवाहात....
पण...तू गेलास हात सोडून..
मी गटांगळ्या खात राहिले....बेभान झाले...पण नंतर सावरले...आणि वाट पाहत राहिले..तू येशील..

आणि काय आश्चर्य..तू यायचास...सोबत असायची वेगवेगळी कारणे..मला सोडून गेल्याची... कसा तू किनाऱ्यावरून मला बघायचास आणि कसे मी ही प्रयत्न केले तर मला तू किनाऱ्यावर दिसशील..काही क्षण सोबत ..मला आस की ह्या वेळेस नाही हात सोडून जाणार...पण ..परत ते च. 
असे हे कितीतरी वेळ झाले...मागील दोन अडीच वर्षात!!
कालांतराने मला लक्षात आले..मी वेडी आहे...तुला जबरदस्ती करण्यात अर्थ नाही.
त्या प्रेमाच्या महासागरात माझ्या सोबत वाहत जाणे अथवा वाहवत जाणे  तुला शक्य नाही...तो तुझा पिंड ch नाही... तुझी क्षमता ch नाही..
हे कळायला फार वेळ लागला..

आणि त्यामुळे मी आता किनाऱ्यावर उभी आहे..कोरडी..
तू त्या किनाऱ्यावर...मी इकडे.
तू जेव्हा इकडे येशील तेव्हा मी असेन ch...
तू म्हणतोस त्या प्रमाणे ...तुला मी तिथून ही दिसत ch असेल ... तुला हवी तेव्हा मी असेन..

पण मी आता महासागरात उडी नाही मारणार..किनाऱ्यावर उभी असेन..कोरडी !!