मी उभी किनाऱ्यावर..
समोर उभा समुद्र...
अथांग...विशाल..
विचार करते जाऊ का समुद्राला सामोरे..माझा निभाव लागेल का त्याच्यासमोर की मी वाहून जाईल....त्याच्या भव्य लाटांमध्ये..
पण त्याच्यावरच प्रेम मला ओढून आणतच त्याच्याजवळ...
जवळ येताच तो दिसतो अजून सुंदर
त्याच ते निळशार रूप..त्यावर पडणारी सूर्याची किरणे..तापलेला सूर्य ही जणू गार करण्याची क्षमता असलेला तो..
आणि ती किरणे सुद्धा चमकावून टाकणारा माझा प्रिय समुद्र..
सांजवेळी रंगाची उधळण आकाशात आणि तो..ह्यांचे मिलन म्हणजे एक सुखद अनुभव...
मी ही अशीच वेडी होऊन..स्वतःच अस्तित्व विसरून त्याच्या जवळ ...प्रेमात चिंब भिजायला आतुर..
जवळ येताच प्रेमाच्या लाटेने मला नखशिखांत भिजवून टाकणारा तो...
उंच लाट जरी नसली तरी साधी पायाला स्पर्श करणारी त्याची हळूवार प्रेमाची फुंकर ही मोहरुन टाकणारी ..
पण .
पण..
दर वेळेस मला प्रेमात भिजवून तो दूर जातांना पायाखालची जमीन हलवून जातो..मला अस्वस्थ आणि हतबल करून जातो...परत भेटण्याची आतुरता जागवून..
पण..
भरती च्या वेळेला
किनाऱ्यावर असणाऱ्या मला
भेटायला आतुर असलेला तो..
ओहोटी चा शाप घेऊन आला आहे..
त्याची ही ओहोटी कधी संपेल ह्याची मी आतुरतेने वाट बघत..किनाऱ्यावर उभी ...
ओहोटी चा त्रास होऊ नये म्हणून
ओहोटी ची च सवय करून घेतलेली मी...
माझे आणि त्याच्यातील अंतर वाढत आहे हे बघून ...किनाऱ्यापासून दूर दूर मी.....
त्याचे नी माझे अंतर वाढत असलेले बघून....
येईल का त्याला भरती अवेळी ..
की मी अशीच त्याची वाट बघत बसेन आणि कधी मी किनाऱ्यावर नाही तर वाळवंटात आहे हे कळणार च नाही मला....
तो समुद्र नसून ते तर होते एक मृगजळ ..होते एक मृगजळ !!!